वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा या महत्त्वपूर्ण विषयावर दि. 25 नोव्हेंबर रोजी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे होते. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी सुरक्षा, शिस्त, जागरूकता आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर या विषयांवर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात निरीक्षक शंकर शिंदे यांनी स्पष्ट केले की,समाजातील वाईट प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कटीबद्ध असते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासाकडे लक्ष देत विज्ञानतंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आत्मसुरक्षा व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयातील शिस्त, परस्पर समन्वय आणि सुरक्षित वातावरण विद्यार्थ्यांच्या भविष्यनिर्मितीत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रभावी चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जागरूकतेचा नवा दृष्टिकोन निर्माण झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक सावंत, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कदम, प्रास्ताविक तिकटे, तर आभार प्रदर्शन शिंदे यांंनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
