धाराशिव (प्रतिनिधी)- भुलथापा मारणे, हवेतल्या गप्पा करून जनतेला फसवणे एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व असल्याच शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यांचा 'विकास' हा फक्त कागदावरचा असून प्रत्यक्षात होणाऱ्या विकासाला आडकाटी आणणे ही राणा पाटील यांची ओळख आहे. यावेळी गुरव म्हणाले की, राणा पाटील यांनी त्यांच्या भविष्यातील शहर विकासाचे पाच ठळक मुद्दे मांडले. यामध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सोडला पण ते कस देणार हे आपण सांगणार नसल्याच ते म्हणाले. म्हणजे पहिलाच मुद्दा हवेत गप्पा मारल्यासारखा झाला. दुसरा मुद्दा रस्त्याच्या जवळपास दीडशे कोटीच्या निधी बाबत व अन्य निधी आणण्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर गुरव म्हणाले मर्जीतल्या गुत्तेदारास रस्त्याचं काम मिळावं यासाठी वीस महिने प्रक्रिया याच राणा पाटलांनी राबवू दिली नाही.त्यामुळं शहरवासियांना झालेल्या त्रासाला फक्त तुम्ही जबाबदार आहात. निवडणुकीच्या तोंडावर अजून निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. शिवाय जे 140 कोटी निधी आणला म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत आहेत आतापर्यंत हे रस्ते फक्त तुमच्या कमिशन साठी थांबवले असा याचा अर्थ निघतो. ज्या शहरात भुयारी गटार योजना राबवली जाते तिथं रस्त्यासाठी 500 कोटींचा निधी मिळत असतो. मात्र यांच्याकडून फक्त 140 कोटी एवढाच निधी शहरास मिळाला. म्हणजे शहराच्या हक्काच्या 360 कोटींचा निधी यांना आणता आला नाही हे यांचं कर्तृत्व असल्याच गुरव म्हणाले. 

तिसरा मुद्दा त्यांनी सफाई व कचरा डेपो च्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगितलं. त्यावर गुरव यांनी राणा पाटील यांना प्रतिप्रश्न केला 4 वर्ष प्रशासकाचा काळ असो की 2019 पर्यंत तुम्हीच इथं आमदार असो त्या अगोदरही सत्ता तुमचीच होती. मग तेवढ्या काळात तुम्हाला हा प्रश्न का सोडवता आला नाही शिवाय तुमचेच बगलबच्चे यांच्याकडे या कामाचं टेंडर होते. तुम्ही पुन्हा तेच करण्यासाठी सत्ता मागत आहात का? असा प्रश्न गुरव यांनी राणा पाटलांना विचारला. 

चौथा मुद्दा त्यांनी उद्यान निर्मितीसाठी पाच वर्षात 25 कोटींचा निधी आणतो म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्यामुळे यांनी तीन बगीचासाठी सात कोटी व आठवडी बाजारासाठी दहा कोटी असा बारा कोटीचा निधी मंजूर केला होता. महायुतीचे सरकारने सत्तेवर येताच या कामाना स्थगिती दिली. 2022 पासून आतापर्यंत तुम्हाला ही काम करणं का झालं नाही याचेही उत्तर राणा पाटील यांनी द्यावं असं आव्हान गुरव यांनी दिले आहे. पाचवा मुद्दा पारदर्शक प्रशासन आणणार ते जनतेनं जिल्हा परिषद व 2016 पर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचा कारभार पाहिलेला त्यामुळं त्यावर तर आपण न बोललं बरं होईल असाही टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. 

डिसेंबर 2021 पासून पालिकेवर प्रशासक आहेत. महाविकास आघाडी सरकार जुलै 2022 पर्यंत होत. त्यानंतर पुन्हा राणा पाटील यांचीच सत्ता आहे. 2014- 2019 तेच धाराशिवचे आमदार होते. डिसेंबर 2016 ला पालिका निवडणूक झाली तेव्हापासून ऑक्टोबर 2019 पर्यंत तुम्हीच आमदार होतात. मग त्याकाळात आपण काय केलं? निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या थापा मारायच्या व हवेत बोलायचं एवढंच तुमच कर्तृत्व असून विकासाची तुम्हाला किती तळमळ आहे हे जनतेला चांगल माहिती आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top