तुळजापूर (प्रतिनिधी)- रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी CSR“रोटरी इंडिया नॅशनल अवॉर्ड 2025” जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर या कंपनीने मोठ्या उद्योगसमूह या गटात आरोग्य क्षेत्रातील बेस्ट प्रोजेक्ट हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
रोटरी इंटरनॅशनलचे संचालक श्री. के. पी. नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ माणेकशॉ सेंटर, दिल्ली येथे 13 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडला. या वेळी रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री. शरत जैन, सचिव मंजू फडके, तसेच रोटरी इंडिया नॅशनल अवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते.
सोलापूर स्थित बालाजी अमाईन्स लिमिटेड ही अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, व्यावसायिक यशासोबतच आरोग्य क्षेत्रातही ती सातत्याने उल्लेखनीय सामाजिक कामगिरी बजावत आहे. कोविड काळापासून कंपनीने सोलापूर शहरातील तीन रुग्णालयांचे नूतनीकरण करून, अत्यल्प किंमतीत किंवा विनामूल्य आरोग्यसेवा देण्याची सुविधा निर्माण केली आहे. या रुग्णालयांमध्ये आज अत्याधुनिक वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड आहेत.
या प्रसंगी बोलताना डी. राम रेड्डी म्हणाले, “ CSR ची कायदेशीर जबाबदारी लागू होण्यापूर्वीच आमच्या व्यवस्थापनाने 1990 च्या दशकात ‘बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. आमचे चेअरमन श्री. ए. प्रताप रेड्डी नेहमी सांगतात ‘ज्या समाजातून आपण कमावतो, त्यालाच काहीतरी परत द्यावे; हाच खरा CSR चा अर्थ आहे. ते पुढे म्हणाले, “हा राष्ट्रीय सन्मान आमच्या टीमच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. आम्ही आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रांमध्ये केलेले कार्य इतर उद्योगांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
