धाराशिव(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी व सर्व शिक्षकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. पंडित नेहरूंना मुले व फुले खूप आवडायची मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठे असे योगदान दिले. तसेच प्रत्येक गावात शाळा निर्माण झाली पाहिजे व प्रत्येक गावातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे व शिकले पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. यावेळी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंचा गणवेश परिधान केला होता. इयत्ता पहिलीच्या आरोही वीर, समीक्षा पौळ, यशश्री कदम, मृणाली क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी तसेच आर्यन माळी याने पंडित नेहरूंच्या जीवनावर खूप सुंदर असे भाषण केले. तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती दिली त्यानंतर इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून सर्व मुलांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नेहा भंडारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजेंद्र दीक्षित यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून श्रीमती सुमन इंगळे, स्वाती मुपडे,महादेवी सावळकर, अश्विनी भांगे, दादासाहेब कचरे यांनी परिश्रम घेतले.
