भूम (प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं कि त्यांच्या समोर सतत कामाचा व्याप मोठया प्रमाणात असतो. सततच्या कामाच्या व्यापातूनही ते पोलीस ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधतात. कामाचा ताण असतानाही ठाण्यात आलेल्या नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी कर्मचाऱ्यांना 24 तास देखील कर्तव्यावर राहण्याची वेळ येते. तरी देखील ते कर्तव्यात कसूर करत नाहीत. सततच्या कामामुळे त्यांच्यात मरगळ न येता उत्साह टिकून राहावा, कामे तात्काळ व्हावीत, यासाठी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी “ स्टार ऑफ द मंथ “ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुलै 2025 पासून त्यांनी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याच्या मानकरी महिला पोहेकॉ शबाना मुल्ला या ठरल्या आहेत. तर ऑक्टोबर महिन्याचे मानकरी पोना संदेश क्षिरसागर हे ठरले आहेत. भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या हस्ते त्यांना त्या कर्मचाऱ्यांचा फोटो व भूम पोलीस ठाण्याचा लोगो असणारा कप व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या मानकरी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा लेखा जोखा ठेवण्यात येत आहे. एका महिन्यात जे कर्मचारी तपासासाठी असणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करतात. तपास करून अंतिम अहवाल तयार करून सादर करतात. तसेच इतर कामकाजाचा आढावा घेतला जातो. त्यानंतर हा पुरस्कार पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते देण्यात येतो.
कर्मचाऱ्यांचा कामकाजात उत्साह वाढावा हा या उपक्रमामागे उद्देश आहे. तसेच नागरिकांची कामे यामुळे तात्काळ निकाली निघण्यास मोठी मदत होणार आहे. मी जोपर्यंत या ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत आहे तोवर हा उपक्रम चालू ठेवणार आहे.
श्रीगणेश कानगुडे
पोलिस निरीक्षक भूम पोलीस ठाणे
