धाराशिव (प्रतिनिधी)-  इस्रो सारख्या संस्थेत आमचे विद्यार्थी आता काम करतात हा आमच्या महाविद्यालयाचा गौरव आहे. असे प्रशंसनीय उद्गगार तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी काढले.

नुकताच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी आदेश भोरे याची इस्त्रोमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 2022 चा विद्यार्थी आदेश भोरे हा इस्त्रोमध्ये सध्या कार्यरत आहे. पदवीनंतर  एवढ्या अल्पावधीत निवड झाल्याबद्दल मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने त्याचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, एम जी चौधरी, डी.डी.लिंगे, रामेश्वर मुंडे, किरण बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सत्काराला उत्तर देताना आदेश भोरे म्हणाले की, धाराशिव सारख्या भागात असून सुद्धा महाविद्यालयाने शहरी भागात मिळणाऱ्या सर्व सुविधा आम्हा विद्यार्थ्यांना पुरविल्या.  अगदी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षापासून नियोजित अभ्यासक्रमाबरोबरच तांत्रिक कौशल्यावर भर देऊन महाविद्यालयाने अनेक उपक्रम राबविले. मी पहिल्या वर्षापासून सातत्यपूर्ण प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रियपणे भाग घेऊन अभ्यास पूर्ण केला. त्यामुळे पदवी मिळाल्याबरोबर माझी इस्रो सारख्या संस्थेत निवड झाली याचा मला स्वतःलाही आनंद आणि अभिमान वाटतो. यापुढेही असे अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून घडतील अशा शुभेच्छा आदेश भोरे यांनी याप्रसंगी दिल्या.  आदेश भोरे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही आदेश यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आणि महाविद्यालयाने सत्कार करून शुभेच्छा दिल्याबद्दल आदेश भोरे यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.

 
Top