तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला असून उमेदवार दारोदारी जाऊन मतदारांचा कौल मिळवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. तुळजापूरचा मतदार लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद या तिन्ही पातळ्यांवर वेगळे निर्णय देतो, याची प्रचिती मागील अनेक निवडणुकांत आली आहे.

लोकसभेला येथे शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर यांना, तर विधानसभेला भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे यंदा नगरपरिषदेसाठी मतदार कोणत्या पक्षाला झुकत आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुळजापूरच्या मतदारांचा इतिहास पाहता एक काळ काँग्रेस, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष दीर्घकाळ, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्याकडे मतदारांचा कल होता. मात्र अलीकडच्या वर्षांत परिस्थिती बदलली असून हा मतदार कोणाला बहुमत देणार, यावर सर्वांचे लक्ष आहे. येथील मतदारांनी भूतकाळात मुस्लिम, ब्राह्मण, मराठा, दलित आणि अगदी महंतांनाही कारभार करण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिराशी निगडित मोठा पुजारी वर्ग असल्याने त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या गटाला नेहमीच ते सहकार्य करतात. गत 1015 वर्षांत मोठ्या प्रमाणात बाहेरील मतदारांची नोंद झाल्याने तुळजापूरचे मूळ राजकीय समीकरण ढवळून निघाले. या बदलानंतर निवडणुकीत धनशक्तीचा वापर वाढला असून निवडणूक लढती अधिक चुरशीच्या बनू लागल्या आहेत.


नगरपरिषद क्षेत्र वाढले, समस्या जशाच्या तशाच

तीर्थक्षेत्र तुळजापूर वेगाने वाढत असून भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता यांसह मूलभूत सुविधांवर ताण वाढला आहे. शहरवासीयांचे एकच म्हणणे  “मूलभूत सुविधा द्या सत्ता हाती घ्या!”


तरुणाई राजकारणात अग्रभागी

पूर्वी अनुभवी मंडळींच्या हातात कारभार होता. मात्र वयोमानामुळे ती पिढी मागे हटली आणि नेतृत्वाची धुरा तरुणांच्या हातात आली आहे. यंदा मोठ्या संख्येने तरुण-तरुणी निवडणुकीत उभे आहेत


निकाल ठरवतील तुळजापूरची भावी दिशा

यंदा मतदारांसमोर नगराध्यक्षपदासाठी स्पष्ट पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल तुळजापूरच्या भावी राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारा ठरणार आहे.


 
Top