धाराशिव (प्रतिनिधी)- आरोग्य विभागाच्या विविध समित्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका 20 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आल्या.या सभेत जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, डॉ.सतीश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.धनंजय चाकूरकर जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.मारुती गोरे,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), डॉ.अभिजीत बनसोडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ.के.के.मिटकरी,जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, डॉ.सुशील चव्हाण,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमजान शेख,वैद्यकीय अधिकारी श्री.आर.बी.जोशी, प्रशासकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सास्तुर तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय प्रमुख,सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते.
बैठकीत मुख्यत्वे खालील समित्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रुग्ण कल्याण समिती (जिल्हा रुग्णालय धाराशिव),जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी,आपत्कालीन वैद्यकीय सेवा (108), पी.सी.पी.एन. डी.टी.सल्लागार समिती,तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती, आर.के.एस समिती,प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स,15 वा वित्त आयोग,जन्म-मृत्यू नोंदणी समन्वय समिती, अनधिकृत वैद्यकीय व्यावसाय (बोगस डॉक्टर) शोध समिती व राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रगती,मातृ-मृत्यू व बाल-मृत्यू दर कमी करण्यासाठीचे उपक्रम,कुपोषण निर्मूलन मोहिमेची स्थिती,प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्रांतील सुविधा,रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सद्यस्थिती, तसेच डेंग्यू,मलेरिया,क्षयरोग,कुष्ठरोग आदी आजारांविरोधातील उपाययोजना या सर्वांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींवर मार्गदर्शनही करण्यात आले.
या सभेमध्ये जिल्ह्यातील आरोग्य संस्था-निहाय टीबीमुक्त भारत अभियानाचा देखील आढावा घेण्यात आला.यात 2 लाख 83 हजार 174 जोखीमग्रस्त लोकसंख्येची निक्षय पोर्टलवर नोंदणी करायची असून 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत एक लाख 15 हजार 444 एवढी नोंदणी पूर्ण झाली आहे.तसेच 44 हजार 613 एक्स-रे झालेल्या व्यक्तींची नोंदणी निक्षय पोर्टलवर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागांमध्ये संशयित क्षयरुग्ण शोधण्याचे काम उद्दिष्टानुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते दोन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यात आले.क्षयरुग्णांच्या पोषणासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले. बैठकीच्या शेवटी,जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी पुढील कालावधीसाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.