धाराशिव (प्रतिनिधी)- बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी जमिनी विकली या रागातून आरोपी सागर अच्युत शिंदे (वय 21) याने वडिलांचा निर्घूण खून केल्याप्रकरणी आरोपी मुलास आजन्म कारावासाची शिक्षा व 5 हजार रूपये दंड याप्रमाणे कळंब अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सागर अच्युत शिंदे (वय 21 वर्षे, रा. कोथळा, ता. कळंब) यास चार बहीणी असून, चार बहिणीचे लग्न त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे असलेल्या कोथळा शिवारातील शेती विक्री करून केलेली आहे. आरोपीची आई मयत आहे. आरोपीच्या वडिलांनी मुलींच्या लग्नाकरिता शेत विक्री केली असल्याचा राग आरोपीच्या मनामध्ये असल्याने व वडिल व्यसनी असल्याने आरोपी त्यांच्या वडिलांसोबत सतत भांडण करीत होता. दि. 28 मार्च 2022 रोजी रात्री 7 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान कोथळा शिवारातील गट क्रमांक 114 मधील नाल्यामध्ये आरोपी सागर अच्युत शिंदे व त्याचे वडिल मयत अच्युत भागवत शिंदे त्यांच्यामध्ये शेती विक्री कारणावरून भांडण झाले. त्यामध्ये आरोपी सागर याने त्याचे वडिल अच्युत शिंदे यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने, दगडाने, लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. त्यानंतर मयत अच्युत यास दोन्ही पायास धरून शेत गट क्रमांक 136 मध्ये ओडत नेहून बैलगाडीमध्ये टाकून घेवून जात असताना मिळून आला. म्हणून यातील आरोपी सागर शिंदे यांच्या विरूध्द शिराढोण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव जी. नेटके यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरील प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांच्या न्यायालयात झाली. यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी सागर शिंदे यास भादंवि कलम 302 प्रमाणे आजन्म कारावास व 5 हजार रूपये दंड अशी न्यायालयाने दि. 18 नोव्हेंबर रोजी सुनावली.