धाराशिव (प्रतिनिधी)- अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यातच तब्बल अडीच लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. शासनाने 4 लाख 4 हजार 656 शेतकऱ्यांसाठी 292 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. मात्र आतापर्यंत 2 लाख 7 हजार 790 शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. अजूनही 40 टक्के शेतकऱ्यांना रक्कमेची प्रतिक्षा आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मूग, उडीद पिकांसह सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. नदी व ओढ्याकाठची पिके वाहून गेली होती. सप्टेंबर महिन्यात अडीच लाख हेक्टरवर पिके पाण्यात गेली होती. आर्थिक अडचणीत सापडलेल्या 4 लाख 4 हजार 656 शेतकऱ्यांसाठी 292 कोटी 49 लाख 22 हजार रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. तहसीलकडून पोर्टलवर 2 लाख 64 हजार 159 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 लाख 7 हजार 790 शेतकऱ्यांच्या खात्यात 172 कोटी 97 लाख 82 हजार जमा केले. पोर्टलवर अपलोड 47 हजार 458 शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने त्यांची रक्कम रखडली आहे. 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप अपलोड केल्या नसल्याचे महसूलच्या अहवालातून समोर आले आहे.