धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीतील तुतारी चिन्हावरील 30 उमेदवार व दोन पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभा उत्साहात आणि विजयी निर्धारात पार पडली. सभेला प्रचंड जनसमुदायाने उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

आपल्या प्रभावी भाषणात शशिकांत शिंदे म्हणाले,“महाविकास आघाडीसोबत लढण्याची आमची इच्छा होती; भाजपाला फायदा होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र आम्हाला कमी लेखले गेल्याने तुतारी चिन्हावर स्वतंत्र लढत देणे भाग पडले आहे.”

ते पुढे म्हणाले, आजचा हा जनसागर या गोष्टीची साक्ष देतोय की परवीन खलिफा कुरेशी आजच विजयी झालेल्या आहेत. लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारा माणूस जाती-धर्म पाहत नाही. सर्व समाजबांधवांनी चांगल्या उमेदवारांना साथ द्यावी.”भारतीय जनता पार्टीवरही मतचोरीचा आरोप करत त्यांचाही खरपूस समाचार घेतला.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही नाव न घेता यावेळी टीका केली.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मुस्लिम समाजाला दिलेल्या प्रतिनिधित्वाचे आणि पक्षाने दाखवलेल्या खऱ्या पुरोगामी विचारांचे विशेष कौतुक केले. तुतारी चिन्हावरील उमेदवार विजयी झाल्यास जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पाच वर्षांत पूर्ण करण्याची शपथ त्यांनी घेतली.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, धाराशिव जिल्हा निरीक्षक भारत जाधव,प्रदेश चिटणीस मसूद शेख,माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन खलिफा कुरेशी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे तसेच पक्षाचे 32 उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,विलास रेणके,मनीषा पाटील,शहराध्यक्ष रणवीर इंगळे, उमेदवार अर्चना अंबुरे,तेजस भालेराव, शिवशाहीर अनिल माने,उमेदवार हिना शेख यांसह इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयाज शेख यांनी केले तर प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.तुषार वाघमारे यांनी केले. या जाहीर सभेतून धाराशिवमध्ये तुतारीच्या बाजूने स्पष्ट जनमत तयार होत आहे, हे ठळकपणे जाणवले.

 
Top