धाराशिव  (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात बालविवाहमुक्त अभियानाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन 1098 तर्फे विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये बालहक्कांविषयी जागरूकतेची नवी चेतना निर्माण होत आहे.प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी,शिक्षक आणि स्थानिक प्रशासनाचा भरभरून प्रतिसाद मिळत असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी समाज एकदिलाने पुढे येताना दिसत आहे.

नुकतेच ज्ञानोद्योग कनिष्ठ महाविद्यालय,येरमाळा येथे प्रभारी जिल्हा महिला अधिकारी श्री.किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे व चाइल्ड हेल्पलाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बालहक्क,बालसमस्या,बालविवाहाचे धोके, तसेच बालकांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.चाइल्ड हेल्पलाईन कक्षाच्या सूपरवायजर श्रीमती पल्लवी पाटील यांनी 1098 हेल्पलाईनची गरज,कार्यपद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीत कशी मदत मिळते याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जि.प.प्रा.शाळा खताळवाडी, गडदेवदरी, तसेच सैनिकी विद्यालय तुळजापूर व जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथेही मुलांशी संवाद साधण्यात आला. यावेळी मुलांच्या समस्या जाणून घेऊन बालविवाह प्रतिबंध, तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणांची माहिती देण्यात आली. चाइल्ड हेल्पलाईन कक्षातील समुपदेशक वंदना कांबळे, सूपरवायजर अशोक चव्हाण, केस वर्कर अभय काळे यांनी 1098 विषयी माहिती देत विद्यार्थ्यांना भीती न बाळगता “आवाज उठा,1098 ला कॉल करा” असा संदेश दिला.

तसेच मौलाना आझाद उर्दू शाळा, धाराशिव व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय,येरमाळा येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, जयश्री पाटील, प्रकल्प समन्वयक श्री.विकास चव्हाण, तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक प्रियांका जाधव यांनी मुलांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले.चाइल्ड हेल्पलाईन 1098 विषयी सविस्तर माहिती श्रीमती पल्लवी पाटील,केस वर्कर अभय काळे यांनी दिली. या सर्व उपक्रमांतून मुलांना “तुम्ही एकटे नाही, 1098 तुमच्यासोबत आहे” हा आश्वासक संदेश देण्यात आला. शाळांमध्ये मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता धाराशिव जिल्हा बालविवाह व बालशोषणाविरुद्ध सजगपणे लढा देत असल्याचे स्पष्ट होते.

 
Top