तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी आपल्या कन्यं आरणा हिचा वाढदिवस परंपरागत हिंदू संस्कृतीनुसार साजरा करत सामाजिक संदेश दिला आहे. मंगळवार, दिनांक 18 नोव्हेंबर रोजी देवीचा वारही आहे. पूजार यांनी पाच दिवस आधी नियमित भाविकांप्रमाणे अभिषेक पास काढून, श्री तुळजाभवानी मातेचा दही-दूध पंचामृत अभिषेक करून आशीर्वाद घेतला.
विशेष म्हणजे, आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास पुण्याहून फुले मागवून त्यांचा हार तयार केला व तो श्री तुळजाभवानी मातेस अर्पण केला. देवीचा प्रथम कुलधर्मकुलाचार केल्यानंतर ते आपल्या परिवारासह धाराशिवकडे रवाना झाले. यावेळी त्यांची सौभाग्यवतीही उपस्थित होत्या.
पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याचे प्रचलन वाढत असताना, जिल्हाधिकारी पूजार यांनी मात्र सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच नियमपूर्वक पास घेऊन देवीचे दर्शनअभिषेक करत आपला वाढदिवस भारतीय परंपरेत साजरा करण्याचा आदर्श ठेवला आहे.
त्यांच्या कन्येचा असा पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला वाढदिवस शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला. धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य जपणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
आम्ही अभिषेक पास काढूनच कुलधर्म करतो - प्रशासकीय अधिकारी माया माने
या बाबतीत बोलताना मंदिर संस्थांनच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने म्हणाल्या की आम्ही आमच्या घरातले धार्मिक विधी असली की रीतसर पास काढूनच धार्मिक विधी कुलधर्म कुलाचार करतो.
