धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलि निरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. या चौघांनाही पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी गुरूवारी निलंबित केले आहे. 

लोहारा येथील पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्या व्यक्तीला सहआरोपी करण्याची धमकी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे व अन्य तिघा पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली होती. त्यांनी दबाव आणून पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. या सोबतच रक्कम मिळेपर्यंत हमी म्हणून त्यांनी दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिनेही ठेवून घेतले होते. या प्रकरणी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली. 

या चौघांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सहाय्यक पोलिस फौजदार निवृत्ती बळीराम बोडके, पोलिस शिपाई आकाश मधुकर भोसले आणि पोलिस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे यांना पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी गुरूवारी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलिस खात्यात खळबख उडाली असून, लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

 
Top