भुम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. शारदा मोरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली भावनिक गुंतागुंत, मोबाईलचा अतिरेक, शिक्षणातील लक्ष केंद्रीकरण आणि करिअर नियोजन या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीच्या शंका, समस्या समजून घेत त्यांनी योग्य मार्गदर्शनही केले.
त्याचप्रमाणे मुलींच्या मासिक पाळी व आरोग्यविषयक जाणिवा वाढविण्यासाठी डॉ. दुर्गा खैरै यांनी उपयुक्त माहिती दिली. किशोरवयात येणाऱ्या शारीरिक बदलांबरोबरच स्वच्छता, पोषण आणि आरोग्य संवर्धन याविषयी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी भूषविले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, विद्यार्थ्यांचे पालक तसेच महिला प्रतिनिधी म्हणून सौ. मंदा शिर्के उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चव्हाण दिपाली यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. धनश्री पिंपरे यांनी तर आभार प्रदर्शन मराठी विभागाच्या प्रा. उर्मिला नाईक यांनी केले. समुपदेशनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढून वैयक्तिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
