तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेऊन तेली समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या “संत जगनाडे महाराज महामंडळा”ला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व या महामंडळाच्या माध्यमातून तेली समाजातील नवउद्योजक घडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी तेली समाजाचे युवा नेते व भाजप ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब घोडके यांनी केली.
या भेटीत दादासाहेब घोडके यांनी तेली समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांमधून अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या प्रसंगी तेली समाजाचे जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. विशाल नाना साखरे, जिल्हा तेली समाज प्रसिद्धी प्रमुख कपिल नवगिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यानंतर दादासाहेब घोडके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली. या भेटीत काटगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून उमेदवारीच्या मागणीसंबंधी चर्चा करण्यात आली. त्यांनी समाजाच्या विश्वासास पात्र ठरवून कार्य केल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. तेली समाजाच्या हक्कांसाठी व विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास दादासाहेब घोडके यांनी व्यक्त केला.
