तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची शिगेला पोहोचलेली तयारी आता महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांत जोर धरत आहे. दोन्हीकडील पक्षांनी उमेदवार निश्चीती, जागा वाटप आणि आर्थिक नियोजनावर गुप्त चर्चांचा वेग वाढवला आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही पक्षांनी तुळजापूरमध्ये प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. बैठकीत जागा वाटप, उमेदवार निवड, प्रचार निधी आणि स्थानिक पातळीवरील समन्वय या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे भाजपनेही आपली उमेदवार निश्चिती आणि आर्थिक तयारीला वेग दिला असून, महायुतीच्या एकूण रणनितीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जाते. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना त्यांच्या होमग्राउंडवर अडवण्यासाठी रणनीती आखत आहे. यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सक्षम, स्थानिक उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी आघाडीत एकजूट राखण्यासाठी दोन पावले मागे घेण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेसोबत प्राथमिक बैठक पार पाडून संभाव्य उमेदवार व खर्च तयारीचा आढावा घेतला आहे. मात्र या बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते प्रथम पक्षांतर्गत चर्चा पूर्ण करूनच अंतिम बैठकीस बसणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय  अंतिम बैठक लवकरच होणार असून जागा वाटप जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, तुळजापूर नगरपरिषद क्षेत्रातील काही प्रमुख प्रभागावर  काँग्रेस  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) इच्छुक आहेत. त्यामुळे आघाडीतील जागावाटप निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, भाजपनेही गुरुवारी झालेल्या बैठकीत आपली रणनीती आखून प्रचार मोहिमेची दिशा ठरवली आहे. दोन्ही आघाड्यांतील हालचालींमुळे तुळजापूर नगरपरिषद निवडणूक चुरशीची आणि अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.

 
Top