धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे भारतीय संविधानाला आज 75 वर्षे पूर्ण झाली. संविधान 1949 रो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आणि 26 जानेवारी 1950 रो. लागू झाले. संविधान अर्पणाच्या कार्यक्रमात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक निमित्ताने बेंबळी येथे भव्य संविधान सन्मान रॅली आयोजित कढण्यात आली.

रॅलीचे नेतृत्व माजी सरपंच बाळासाहेब माने यांनी केले. नागरिकांनी निळ्या ध्वजांनी, संविधानिक बॅनर आणि आंबेडकरी विचारांच्या फलकांनी गाव सजवले. रॅलीदरम्यान सतत जय भीम, जय संविधान, भारतीय संविधान अमर राहो, लोकशाही जिंदाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहें आणि सामाजिक न्याय जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

गावातील महिला, पुरुष, तरुण, विद्यार्थी आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषतः महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, ज्यांनी उत्साहाने रॅलीत सहभाग घेतला आणि संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. सर्वांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. रॅलीदरम्यान पोलीस बंदोबस्ताची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, ज्याबद्दल ग्रामस्थ आणि आयोजकांनी पोलीस प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले. समारोपाला मिठाई वाटप करून संविधान दिनाचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला गेला. बेंबळीतील ही संविधान सन्मान रॅली निळ्या ध्वजांच्या लहरी, “जयभीमजयसंविधान”च्या घोषणांचा गजर आणि गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली.

रॅलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, त्यांच्या सोबत ॲड. प्रशांत माने, आप्पासाहेब माने, नेताजी लोंढे, अंगूल माने, राहुल मोहिते, बाळू मस्के, सुरज माने, लखन चव्हाण, इंद्रजीत होळकर, करण गायकवाड, जयपाल माने, दादा वाळवे, शशिकांत होळकर, दयानंद गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
Top