धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला नवसंजीवनी देण्यासतठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बँकेला अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदत करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जिल्हा बँकेला देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांच्या शेतजमीनी खरवडून गेल्या आहेत. खरीप हंगाम हातातून गेला आहे. अशा वेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच पतपुरवठा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. होमट्रेड रोखे घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेली धाराशिव जिल्हा बँक प्रचंड अडचणीत सापडली आहे. 440 कोटी रुपयांच्या ठेवी देणारे तब्बल सहा लाख ठेवीदार आर्थिक अडचणीच्या कात्रीत अडकले आहेत. सन 2002 पासून म्हणजेच मागील तब्बल 23 वर्षांपासून जिल्हा बँकेतून शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा चक्क बंद आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारीच्या जोखडातून जावे लागत आहे. कर्जाच्या रकमेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या चलनाचाही सध्या जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. 

 
Top