कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्र मोडकळीस आणण्याच्या शासनाच्या धोरणाविरुद्ध धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर शुक्रवार रोजी सामूहिक रजा घेऊन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेतला असल्याची माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी व नगरपालिका शाळेतील प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक धाराशिव तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. राज्य शासनाने 2013 पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक हे प्रादेशिक निवड मंडळाची पात्रता परीक्षा देऊनच भरती केलेले शिक्षक असताना त्यांना टी ई टी बंधनकारक केली असून ही बाब शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. तसेच 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय शासकीय व अनुदानित शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.
या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मराठवाडा शिक्षक संघ,उर्दू शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा मुख्याध्यापक संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, राष्ट्रीय ओबीसी शिक्षक महासंघ, जिल्हा जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, विकास मगर शिक्षक मित्र मंडळ या प्रमुख 17 संघटना सहभागी होणार आहेत. दिनांक 5 डिसेंबर दुपारी 12-30 वाजता रोजी लेडीज क्लब धाराशिव पासून हा मोर्चा निघणारा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
