उमरगा (प्रतिनिधी)-  नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व चार अपक्ष अशा आठ जणांनी अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतल्याने भाजपाचे हर्षवर्धन चालुक्य, शिवसेनेचे किरण गायकवाड, शिवसेना (ठाकरे) चे रझाक अत्तार व वंचित बहुजण आघाडीचे प्रभाकर मजगे यांच्यात सामना रंगणार आहे. अध्यक्षपदावरुन आघाडी तोडणा-या कॉग्रेसने शिवसेना (शिंदे) ला अध्यक्षपद देत शर्यतीतून माघार घेतली आहे. नगरसेवक पदासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

उमरगा नगरपालिका निवडणुकीत पहिल्या दिवसापासून धाकधूक, शंका, गुप्त बैठका, राजकीय डावपेच टाकले जात होते. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळ्यांवर 'सगळं आलबेल' नसल्याचे सुरुवातीपासून दिसत होतं. महाविकास आघाडीच्या एक दोन बैठकातच सुर जुळले नाहीत. महायुतीच्या नेत्यांनी गुरुवारी रात्रीपर्यंत बैठकांचे सत्र सुरुच होते. परंतु नगराध्यक्ष पदावरुन घोडे आडल्याने गुरुवारी रात्री महायुती दुभंगली. अखेर शहरात नविन राजकीय समीकरणाने जुळले. यामध्ये भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली तर शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतले आहे. शिवसेना (ठाकरे) ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेतले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) व वंचित बहुजण आघाडीने मोजक्या जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत. गुरुवारी अपक्ष उमेदवार नितीन होळे यांनी तर शुक्रवारी अमोल मोरे (काँग्रेस), विक्रम बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस (अप), संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस (शप), शाहुराज माने, शिवशंकर दंडगुले, रफिक अत्तार, शांतप्पा वरकले (सर्व अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे हर्षवर्धन चालुक्य, शिवसेना (शिंदे)चे किरण गायकवाड, शिवसेना (ठाकरे) चे रझाक अत्तार व प्रभाकर मजगे (वंचित बहुजण आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या 25 प्रभागात एकुण 127 अर्ज वैध ठरले होते यापैकी 37 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर 12 प्रभागात एकुण 90 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोरे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु राजकीय तडजोडीत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा उमेदवार नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


 
Top