धाराशिव (प्रतिनिधी)-  सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सरदार अफजलखान यास ठार मारून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 366 वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. 

366 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी बादशाहीचे अफजलखान रुपी आलेले संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार मारून ऐतिहासिक विजय संपादन केला होता. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव या ऐतिहासिक दिनाची स्मृती जागृत व जतन करण्यासाठी हा दिवस शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 2003 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सतत शिवकार्य करणारी समिती संपूर्ण जिल्हाभर कार्यरत आहे. 366 वा शिवप्रताप दिन व शिवराज्याभिषेक सोहळा समिती स्थापना दिन या दोन्हींच्या निमित्ताने धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक व महाभिषेक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत खुणे, गुंडोपंत जोशी, धर्मराज सूर्यवंशी, अमोल पवार, अच्युत थोरात मेजर, धनंजय साळुंके, एडवोकेट संजय शिंदे, हरिश्चंद्र आगळे, हनुमंत तांबे,  दत्ता साळुंके यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिवरायांचा पुतळा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच वाद्यांच्या दणदणाटात व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच समितीच्या मावळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच धाराशिव शहर, तालुका परिसरातील आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते मावळे उपस्थित होते.


 
Top