तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 29 हजार 561 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. शहरात 35 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज स्वीकृतीपासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण यंत्रणा नळदुर्ग रोडवरील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स हॉलमध्ये उभारण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आदी उपस्थित होते.

तहसीलदार बोळंगे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणार असून शहरासाठी 23 नगरसेवक निवडले जाणार आहेत. पत्रकार परिषदेस सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


दुबार आणि मयत मतदारांवरून गोंधळ

मतदार यादीतील दुबार व मयत मतदारांबाबत विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना कडवे प्रश्न विचारले. यावर बोळंगे यांनी स्पष्ट केले की, मतदार नोंदणी, वगळणी आणि सुधारणा करण्याचा अधिकार फक्त भारतीय निवडणूक आयोगाकडे आहे. या उत्तरावरून काही काळ वातावरण तापले होते.


खर्च मर्यादा

नगराध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार रुपये, तर नगरसेवक पदासाठी 2 लाख 50 हजार रुपये इतकी निवडणूक खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.उमेदवारी अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 1 हजार रुपये तर महिला व राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये अनामत रक्कम ठरवण्यात आली आहे.


मतदारसंख्या

पुरुष  14,538, महिला  15,017, इतर  6, एकूण  29,561


 
Top