धाराशिव (प्रतिनिधी)- मुलीच्या सबलीकरणासाठी आणि ॲथलेटिक्स क्षेत्रात उदयोन्मुख प्रतिभावंत खेळाडू शोधण्यासाठी केंद्र शासन, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशात राबविण्यात येणारी अस्मिला लीग ॲथलेटिक्स स्पर्धा येत्या 24 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे पार पडणार आहे. ही माहिती जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा.भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी दिली. देशभरातील मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून ही जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने व महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आणि धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे 14 व 16 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही स्पर्धा होणार आहे.
जिल्हास्तरातून विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना थेट राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची अनमोल संधी उपलब्ध होणार असून, प्रतिभावान मुलींना विशेष प्रशिक्षणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींना मेडल आणि प्राविण्य प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
स्पर्धेतील प्रमुख क्रीडा प्रकार
14 वर्षे मुलींसाठी वय (21/12/2011 ते 20/12/2013) ट्रायथलॉन गट A, B, C): 60 मीटर धावणे, लांब उडी, उंच उड़ी / 1 किलो गोळा पाठीमागे फेक/ 600 मीटर धावणे, छोटा भालाफेक, 16 वर्षे मुलींसाठी वय (21/12/2009 ते 20/12/2011 : 60 मीटर थाटणे, 600 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी(5मी), थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक (10 मीटर रनवे). स्पर्धेत विनामूल्य प्रवेश असून, धाराशिव जिल्ह्यातील शाळा, क्रीडा मंडळे, क्लब व अकॅडमीच्या अधिकाधिक मुलींनी सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिक माहितीसाठी राजेंद्र सोलनकर,राजेश बिलकुले,संजय कोथळीकर,सुरेंद्र वाले,मुनीर शेख,माऊली भुतेकर,सचिन पाटील ,रोहित सुरवसे, ऋषिकेश काळे यांनी केले आहे.
