लोहारा (प्रतिनिधी)- लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. सहआरोपी न करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या या पोलिसांपैकी पोलिस नाईक अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक (प्रभारी) ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्ध बुधवारी दि. 12 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या मित्राविरुद्ध दाखल खुनाच्या गुन्ह्यात स्वतःला सहआरोपी न करण्यासाठी संबंधित पोलिसांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराकडे रक्कम नसल्याने त्याने दहा तोळे सोन्याचे कडे तारण ठेवले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाकडून चार लाख रुपये स्वीकारले, तरीदेखील आणखी पाच लाख रुपयांची मागणी सुरूच ठेवली. एसीबीने केलेल्या पडताळणीत पोलिस भोसले व बोळके यांनी तक्रारदाराचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे उघड झाले. प्रभारी अधिकारी कुकलारे यांनी तक्रारदाराच्या भावाकडून तीन लाख रुपये घेतल्याचे आणि उर्वरित दोन लाख रुपये भोसले किंवा तिघाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीने नियोजनपूर्वक मंगळवारी दि. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भातागळी (ता. लोहारा) येथील शेतामध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून तिघाडे याने दोन लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपींच्या घरांची झडती घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले.
या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7 (अ) आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले (सोलापूर) आणि पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पर्यवेक्षण उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या देखरेखीखाली पार पडली. ही कारवाई लोहारा पोलिस ठाण्यातील भ्रष्टाचारावर मोठा धक्का ठरली असून स्थानिक पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.