धाराशिव (प्रतिनिधी)- नंदुरबार जिल्ह्यातील अमलीबार येथे शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांचे निधन व अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टळावी,यासाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबस चालक व मालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार,दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,एमआयडीसी, प्लॉट नं. पी18, धाराशिव येथे होणार आहे. तरी सर्व स्कूलबस चालकमालकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
स्कूलबससाठी अनिवार्य पालन करावयाच्या उपाययोजना
वेग नियंत्रण यंत्रणा सुस्थितीत आहे का याची तपासणी,अग्नीशमन सिलेंडरची मुदत तपासणे व आवश्यक असल्यास रिफिलिंग करणे,प्रथमोपचार पेटीतील साहित्य पूर्ण आहे याची खात्री,वाहनाची वैध कागदपत्रे इन्शुरन्स,योग्यता प्रमाणपत्र,पीयूसी,टॅक्स,परवाना तपासणी,चालकाकडे वैध अनुज्ञप्ती व बॅजची खात्री केली असावी. विद्यार्थी सुरक्षेसाठी 21 नोव्हेंबरपासून स्कूलबस तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून कागदपत्रांची पूर्तता नसल्यास वाहन विद्यार्थी वाहतूक करू नये.नियमभंग आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1988 अंतर्गत कारवाई केली जाईल,असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.