धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे.स्पर्धांमध्ये उत्कृष्टता साधून राज्य आणि देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.प्रत्येक कलाप्रकार हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग आहे.आत्मविश्वासाने मंचावर उतरा आणि तुमचे उत्तम कौशल्य जगासमोर मांडा.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सव 2025 2026 ची पुष्पक मंगल कार्यालय,धाराशिव येथे आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दीपप्रज्वलन करून केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,जिल्हा युवा अधिकारी श्री.राहुल डोंगरे व तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियंत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.ओमप्रकाश रांजणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समूह लोकगीत,समूह लोकनृत्य,चित्रकला,कथा लेखन,कविता लेखन,वक्तृत्व अशा विविध कलाप्रकारांसोबतच कौशल्य विकास व नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) यांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे.विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात एकूण 35 प्रकल्प सादर झाले असून त्यातून जिल्हा पातळीचा संघ निवडून विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार,तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले. भैरवनाथ नाईकवाडी,तालुका क्रीडा अधिकारी, अक्षय बिरादार,क्रीडा अधिकारी, राजेश बिलकुले, सुनील घोगरे, किशोर भोकरे, नितिन आडसकर,सुरेश कळमकर व व्यंकटेश दंडे आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण सहकार्य करत आहे.
