धाराशिव (प्रतिनिधी)- “बालविवाह मुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाईन 1098 तर्फे 100 दिवसांच्या जनजागृती अभियानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. ए.बी.कोवे आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून संवेदनशील विषयांवर जागरूकता निर्माण करण्यात आली.
धाराशिवमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघूचीवाडी आणि शांतीसागर माध्यमिक विद्यालय,भीमनगर येथे नुकतीच विद्यार्थ्यांसोबत बालहक्क,मुलांना भेडसावणाऱ्या समस्या आणि बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाची माहिती देण्यात आली.चाइल्ड हेल्पलाइनचे सुपरवायझर अमर भोसले यांनी 1098 या जीवनरक्षक हेल्पलाईनची उपयुक्तता समजावून सांगितली.शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प.प्रा.शाळा बावी,भैरवनाथ हायस्कूल धारूर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारूर येथे देखील हा कार्यक्रम घेण्यात आला.या सत्रातही बालविवाहाचे दुष्परिणाम,मुलांचे संरक्षण हक्क आणि बालकांसाठीच्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. अमर भोसले आणि अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना 1098 वर मदत मागण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
हिप्परगा रावा व लोहारा परिसरातील जि.प.प्रा.शाळा हिप्परगा रावा, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय लोहारा, स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा रवा आणि कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगुर येथेही जनजागृतीचे सत्र घेण्यात आले. या उपक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जयश्री पाटील,चाइल्ड हेल्पलाईन समुपदेशिका वंदना कांबळे,केस वर्कर अभय काळे तसेच सखी वन-स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक प्रियंका जाधव आणि वैद्यकीय मदतनीस भाग्यश्री कोळी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना बालविवाह ही गुन्हा आहे,मुलींचे शिक्षण हीच खरी ताकद, आणि अडचणीत असताना 1098 हीच सुरक्षित आश्रयरेषा हे संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आले.शिक्षक,मुख्याध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत अभियानाला भक्कम पाठिंबा देत आहेत.