धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनांची शक्यता लक्षात घेता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदीचे मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी जारी केला आहे.
पोलीस अधीक्षक,धाराशिव यांनी दिलेल्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान विविध पक्ष,संघटना,गट यांच्या सभा, कार्यक्रम आणि प्रचारामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.यामुळे पक्षांतर,गटबाजी, आरोप-प्रत्यारोप यामुळे वाद निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकविमा,नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी,संघटना किंवा इतर व्यक्तींमार्फत अचानक मोर्चे, धरणे, उपोषणे, रास्तारोको, आत्मदहन यांसारख्या आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्र बंदीचे आदेश लागू केले आहेत. अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली.