धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उत्साह संचारला आहे. नुकतेच पाच नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे सात नोव्हेंबरपासूनच डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी कार्यभार स्वीकारत जिल्हाभर बैठका घेऊन संघटनाला वेग दिला. स्थानिक नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवत तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उमेदवार निवडीचे अधिकार स्थानिक स्तरावर सोपवले आहेत.
डॉ. पाटील यांनी धाराशिव, उमरगा आणि नळदुर्ग येथे स्वतंत्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले आहेत. तुळजापूर येथे महाविकास आघाडीतून, तर कळंब येथे आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. भूम, परंडा येथेही स्थानिक आघाड्या करण्यात आल्या आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी पुन्हा जोरात वाजत असल्याचे चित्र दिसत आहे. 64 नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. धाराशिव शहरात नगराध्यक्ष पदासह 32 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले असून नऊ जागांवर स्थानिक आघाडी व काही अपक्षांशी देखील चर्चा सुरू आहे.
तर कळंब 10 उमेदवार, तुळजापूर 3 उमेदवार, नळदुर्ग 12 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, उमरगा 7 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून 64 नगरसेवक पदांसाठी आणि 3 नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील संघटना पुन्हा गतिमान करण्यासाठी आणि पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी डॉ.प्रतापसिंह पाटील सक्रिय आणि कटिबद्ध असल्याचे या हालचालींवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
