धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्येही जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. शेतीसहित रस्ते, पुल, तलाव याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 172 तलावांना क्षति पोहचली आहे. तर भूम तालुक्यातील दोन तलाव फुटले आहेत. यांच्या दुरूस्तीसाठी 42 कोटी रूपयांचे अंदाजपत्रक जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला पाठवले आहे. परंतु अद्यापही या तलावांच्या दुरूस्तीसाठी काहीच पैसे न आल्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नाराजीची भावना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यात यावर्षी 160 टक्के जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. या अतिवृष्टीमध्ये रस्त्यासह पुलपण वाहून गेले आहेत. तर भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे व बुर्डूवाडी हे दोन पाझर तलाव फुटले होते. तर जलसंधारण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबी व इतर वाहनांच्या मदतीने 25 पाझर तलाव व साठवण तलाव फुटण्यापासून वाचविले आहेत. तरी सुध्दा जिल्ह्यातील 172 तलावांना या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या 172 तलावांच्या दुरूस्तीसाठी जलसंधारण विभागाने 42 कोटी रूपयांची मागणी केली आहे. परंतु अद्यापही 42 कोटी रूपये न मिळाल्यामुळे अनेक तलावाला गळती लागली आहे. अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे खरीपातील नगदी पिके सोयाबीन, उडीद, मुग पूर्ण हातचे गेले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांचे काहीतर उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असतानाच 172 नुकसानग्रस्त तलावांच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकारने अद्याप निधी न पाठविल्यामुळे तलावातील पाण्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने राज्य सरकारने नुकसानग्रस्त तलावांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
प्रस्ताव पाठविला
या संदर्भात मृद व जलसंधारण विभागाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला आहे. नुकसानग्रस्त 172 तलावासाठी 42 कोटी रूपयाची आवश्यकता आहे.
प्रभाकर महामुनी
कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग धाराशिव
