धाराशिव (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात किमन तापमानाचा पारा घसराला असून, शनिवारी रात्री किमान तापमान 14 अंशावर आले होते. सलग पाच दिवसापासून तापमानात घट होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात तापमानाचा किमान पारा 16 अंशांवर राहिला होता. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढला आहे. रविवारी कमाल तापमान 21 अंश तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातही घट झाल्याने दुपारनंतर गारवा जाणवतो. रविवार कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस असेल.
थंडीचा जोर वाढताच उबदार कपडे खरेदीला धाराशिव शहरातील कोर्टासमोरील दुकानात स्वेटर, कानटोपी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा गेल्या वर्षापेक्षा जास्त थंडी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. तसेच उबदार कपड्यांच्या किंमतीतही दहा टक्केची वाढ झाली आहे. सायंकाळी 6 वाजताच कडाक्याची थंडी जाणवते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोर्टासमोरील दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसते. दि. 10 नोव्हेंबरला 32.6 अंश सेल्सिअस कमाल तर 16.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 9 नोव्हेंबरला 31.8 अंश सेल्सिअस कमाल तर 15.6 अंश किमान तापमानाची नोंद झाली.