धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित,विना अनुदानित,कायम विना अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नगरपालिका/ नगरपरिषद शाळा तसेच दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानाकरिता शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयानुसार विहीत निकषांप्रमाणे ही योजना सन 2025-26 या वर्षासाठी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने,या योजनेंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांनी 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांचेकडे विहीत नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत अल्पसंख्यांक शाळांना प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.त्यानुसार,खाली नमूद केलेल्या दिनांकांपूर्वी शाळांनी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे सादर करावेत.
सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचा कालबद्ध कार्यक्रम
इच्छुक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. वरीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या सर्व अल्पसंख्यांक शाळांनी त्यांचे प्रस्ताव विहीत मुदतीतच सादर करावेत.विहीत मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत,याची नोंद घ्यावी.