धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 34 उमेदवारी अर्ज आले होते. छाननीनंतर 13 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी 568 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 101 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 17 नोव्हेंबर शेवटची तारीख होती. त्यानंतर 18 व 19 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. तर 6 जणांच्या उमेदवारीवर 8 जणांनी आक्षेप नोंदविला होता. हे आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी फेटाळून आक्षेप घेतलेले उमेदवारी अर्ज वैध ठरवले. 20 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होईल. धाराशिव शहरात 20 प्रभाग असून, एका प्रभागात मात्र 3 उमेदवार निवडले जाणार आहेत. बाकी इतर प्रभागामध्ये 2 उमेदवार निवडले जाणार आहेत. राजकीय पक्षांनी बी फार्म जाहीर केले असले तरी उमेदवारांच्या अर्जासोबत कितीजणांनी बी फार्म लावले आहेत त्यांची अधिकृत घोषणा होईल.
नाराजीचा सूर
अनेक पक्षाने इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देता इतरांना बी फार्म दिल्याने नाराजी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. गुरूवार दि. 20 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राजकीय पक्ष नाराज उमेदवारांची नाराजी कशा प्रकारे दूर करतात याकडे लक्ष लागले आहे.