वाशी (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा क्रीडा कार्यालय व धाराशिव जिल्हा वूशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच क्रीडा व युवक संचलनालय पुणे यांच्या सहकार्याने विभागस्तरीय शालेय वूशू स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी कुस्ती हॉल, धाराशिव येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीचा खेळाडू साद मुजावर (70 किलो गट) याने उत्कृष्ट कामगिरी करत 64 व 74 गुणांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे साद मुजावरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बी. के. नायकवाडी, अक्षय बिराजदार, सचिव आनंद शिंदे, अजिंक्य वराळे, शेख तसेच पंच अविनाश यांनी कार्यभार सांभाळला. मुख्य पंच म्हणून आनंद घाडगे यांनी काम पाहिले. साद मुजावरच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम, क्रीडा शिक्षक प्रा. सरवदे एस. एस. व डॉ. रविंद्र चव्हाण यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साद मुजावरच्या या उल्लेखनीय यशाने वाशीच्या क्रीडा क्षेत्राचा अभिमान आणखी उंचावला आहे.