धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेसह शेतीपूरक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाधित सार्वजनिक कामांच्या दुरुस्तीसाठीचे संबंधित यंत्रणांनी विशेष प्रस्ताव सादर करावेत,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पूजार म्हणाले की, भूम, परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.शेतीपूरक व्यवसायाचेही नुकसान झाल्याने पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पशुसंवर्धन विभागाने तत्काळ पाळीव जनावरांच्या लसीकरण व उपचाराची व्यवस्था करावी तसेच स्थानिक पातळीवर चारा उपलब्ध करून द्यावा.

शैक्षणिक व आरोग्य संस्था दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.अतिवृष्टीमुळे शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,त्यांच्या दुरुस्तीसाठी आपत्ती निवारण निधीतून तरतूद केली जाईल.ही कामे तातडीने हाती घ्यावीत,जेणेकरून विद्यार्थ्यांना,बालकांना व रुग्णांना होणारी गैरसोय टाळता येईल,” असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासावेत आणि जलजन्य तसेच साथीचे आजार उद्भवणार नाहीत यासाठी गावपातळीवर दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची माहितीही दिली.

 
Top