धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) धाराशिव आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक,वीरनारी, विधवा पत्नी आणि त्यांच्या पाल्यांसाठी स्वयंरोजगार मेळावा 15 ऑक्टोबर 2025 रोजी  सैनिकी मुलांचे वसतिगृह,धाराशिव येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती भाग्यश्री पाटील,सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वरिष्ठ न्यायाधीश,धाराशिव,तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पांडुरंग मोरे,प्रकल्प अधिकारी,एमसीईडी धाराशिव उपस्थित होते.तसेच श्री.नारायण अंकुशे यांच्यासह जिल्ह्यातील विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यास एकूण 107 उपस्थितांमध्ये वीर माता-पिता,वीर पत्नी,वीरनारी आणि माजी सैनिक तसेच त्यांच्या विधवा पत्नींचा समावेश होता.या प्रसंगी वीर माता, वीर पिता आणि वीर पत्नी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार,तसेच माजी सैनिक व विधवा यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या मेळाव्यात विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी  (नालसा) “वीर परिवार सहाय्यता योजना 2025” अंतर्गत विधी चिकित्सालयाच्या कार्याची माहिती दिली.प्रमुख पाहुणे पांडुरंग मोरे यांनी स्वयंरोजगार व कर्ज योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून माजी सैनिकांना उद्योजकतेकडे प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ वाघ,कल्याण संघटक यांनी केले. गुरुनाथ कुलकर्णी यांनी प्रस्तावना तर ऋत्विज क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top