धाराशिव (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. सोमनाथ लांडगे यांना शिव प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा सन्मान दि. 26 ऑक्टोबर 2025, रविवार रोजी सकाळी 11:00 वा. आळंदी देवाची (पुणे) येथील समृद्धी मंगल कार्यालय, पद्मावती रोड येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या पुरस्काराबाबतचे पत्र संस्थेचे अध्यक्ष मदनजी रेनगडे पाटील यांनी प्रा. सोमनाथ लांडगे यांना पाठवले असून, त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “आपण गेली अनेक वर्ष समाजनिर्मिती व शिक्षण क्षेत्रासाठी अविरत प्रयत्न करत आहात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना यशस्वी जीवनाची दिशा दिली आहे. परिस्थितीचे भान ठेवून योग्य तो निर्णय घेऊन आपण नेहमी समस्यांचे निराकरण करता आणि समाजास प्रेरणा देता. आपले विचार प्रेरणादायी असून, समाज प्रगत करण्याचे कार्य आपण सातत्याने करीत आहात.”

या गौरवाच्या पार्श्वभूमीवर शिव प्रतिष्ठान पुणे यांनी नमूद केले आहे की,“शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आम्ही आपल्याला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करत आहोत.”

या समारंभाला प्रसिद्ध गिर्यारोहक अन्वी घाटगे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी मदनजी रेनगडे पाटील राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री प्रतिक्षा जाधव, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कुऱ्हाडे यांची उपस्थिती लाभणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात प्रा. सोमनाथ लांडगे यांनी घडवलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. श्री साई श्रद्धा एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे 16 जिल्ह्यांमधील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊन डॉक्टर होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तसेच धाराशिव येथे अत्यंत अल्प फीस घेऊन मुलींसाठी वसतिगृह चालवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या श्री साई श्रध्दा सेवाभावी संस्थेच्या मार्फत वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या गरीब कुटुंबातील नऊ मुलींच्या शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत करत आलेली आहे. सध्या प्रा. सोमनाथ लांडगे हे बिल गेट्स ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थी व पालक वर्गात समाधान आणि अभिमानाची भावना आहे.

गेल्या वर्षभरात प्रा. सोमनाथ लांडगे यांना विविध क्षेत्रांतून मिळालेला हा राज्यस्तरीय चौथा पुरस्कार आहे. त्यांच्या या सन्मानामुळे शिक्षक समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.


 
Top