धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महादेवा' ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेद्वारे राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉल क्षेत्रात करिअर घडविण्यास प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.या योजनेचा एक भाग म्हणून 13 वर्षाखालील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीचे आयोजन उपक्रम कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ही निवड चाचणी दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल, धाराशिव येथे पार पडणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा आणि 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना फुटबॉल निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.