भुम (प्रतिनिधी)- भुम परंडा वाशी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोडून राज्यातील सत्ताधारी दळभद्री सरकार शेतकऱ्यांच्या ऊस बिलातुन पैसे कपात करण्याचा निर्णय घेत असल्याने त्यांच्या निर्णयास विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माहिती दिली.
भूम तालुक्यातील आष्टा येथील हभप सतीश महाराज कदम हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भूम उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शनासाठी काल रात्री उशिरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतीश महाराज यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवित सरकार शेतकऱ्यास मदत करताना भेदभाव करीत असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, भुम तालुकाध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हभप सतीश कदम महाराज यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शनासाठी श्री मुक्ताई संस्थान मुक्ताईनगरचे अध्यक्ष भैय्या पाटील व दिंडी प्रमुख हरणे महाराज यांनीही कदम महाराज यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवला. दरम्यान आज शहरातील विविध पदाधिकाऱ्याने यामध्ये भूम तालुका वकील संघटना, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्यासह अनेकांनी कदम महाराजांना भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान राज्यातील शेत बळीराजावर ओढवलेल्या परिस्थिती बाबत शेतकऱ्यास पाठिंबा दर्शनासाठी वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याने नागरिकाकडून त्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे गर्दी होत आहे.