धाराशिव (प्रतिनिधी)- दुधाळ जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अतिवृष्टीची मदत हेक्टरी 50 हजार रूपये तातडीने द्यावी, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे यासाठी धाराशिव व कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमकपणे आंदोलन चालू केले. काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर तर काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरी झाडावर दोरी घेवून चढले. दुपारी 12 वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळीपर्यंत सुरूच होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षात येणाऱ्या प्रश्नाबाबत लेखी पत्र दिल्यास आंदोलन मागे घेण्यात येईल असे सांगितले.
गेल्या चार दिवसापासून जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने अमोल जाधव व राणी बारकूल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी उपोषणाचा चौथा दिवस होता. आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या उपस्थितीमध्ये अनुकंपावरील लोकांना नियुक्तीपत्र कार्यक्रम चालू असतानाच महिला आंदोलकांसह काही आंदोलकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना शेतकऱ्यांच्या विषयावर जाब विचारला. यावेळी आमदार पाटील यांनी कार्यक्रम सोडून उपोषणस्थळी आले. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक उपोषण स्थळी आल्यानंतर आमदार पाटील व जिल्हाधिकारी यांची आंदोलकांबरोबर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी माझ्या कार्यकक्षात येणारे चाऱ्याचा प्रश्न, बी-बियाणांचा प्रश्न, पवनचक्की प्रकरणे, पोलिस कारवाई याबाबत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. कर्जमाफीचा विषयी राज्य सरकारला आपल्या तीव्र भावना कळविण्यात येतील असे ही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन द्या अशी मागणी केली. त्यामुळे सांयकाळपर्यत उपोषण सुरूच होते.
यासंदर्भात जिल्हाधिकारी पुजार यांच्याशी संपर्क साधला असता उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या उपोषणासंदर्भात आपण काय कार्यवाही करतो, यासंदर्भात सरकारला व उपोषणकर्त्यांना लेखी कळवत आहोत असे सांगितले. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपोषणकर्त्यांचे आंदोलन योग्य असल्याचे सांगत सरकार संवेदनशिल आहे. पुढील आठवड्यात कर्जमाफी का कर्जाचे पुर्नगंठण आणि हेक्टरी किती मदत या संदर्भातील घोषणा होईल असे सांगितले.