तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस समर्पित शारदीय नवरात्रोत्सव यंदा पावसाच्या नैसर्गिक संकटातही निर्विघ्न, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. भाविकांची लाखोंची गर्दी, मुसळधार पाऊस, वाहतूक व सुरक्षेचा ताण  या सर्वांवर मात करत प्रशासनाने उत्कृष्ट नियोजनाचे प्रदर्शन घडवून आणले. यंदाच्या नवरात्रोत्सवाची धुरा नवीन जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्याकडे सर्वस्व होती.  पावसाच्या अडथळ्यांना न जुमानता, त्यांनी गणेशोत्सवा पासुन सोळा-सोळा तास रात्रंदिवस मैदानावर राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.


पावसातही सुव्यवस्थित याञा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला पाऊस नवमीपर्यंत थांबला नाही. तरीही भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रण या सर्व बाबी प्रशासनाने कौशल्याने हाताळल्या. पावसाचा ताण आणि भाविकांची प्रचंड गर्दी या दोन्हींचा समतोल राखत याञा निर्विघ्नपणे पूर्ण झाली. 


‌‘ नियोजन'चा कृत्रिम बुद्धिमत्ताचा पहिला प्रयोग यशस्वी. 

यंदा प्रथमच नवरात्रोत्सवाच्या नियोजनात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करण्यात आला. ही संकल्पना गणेशोत्सवात चाचणी म्हणून राबवण्यात आली होती आणि यंदा ती नवरात्रोत्सवात पूर्णपणे लागू करण्यात आली. गर्दी नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद आणि वाहतूक व्यवस्थापनात चा प्रभावी उपयोग झाल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.


तेरा वर्षांनंतर ‌‘सांस्कृतिक महोत्सव'ची पुनरावृत्ती

शहरवासियांच्या मागणीनुसार तेरा वर्षांनंतर यंदा प्रथमच ‌‘श्री तुळजाभवानी सांस्कृतिक महोत्सव' आयोजित करण्यात आला. या उपक्रमाने भाविकांबरोबरच शहरवासियांनाही सांस्कृतिक मेजवानी मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम पुन्हा सुरू करून धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केल्याबद्दल सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.


भाविकांच्या गाड्या थांबविण्याचा निर्णय वादग्रस्त

अश्विनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने भाविकांच्या गाड्या तुळजापूरपासून लांब थांबविण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपेक्षित तयारी न केल्याने  याचा फटका  पायी चालत येणाऱ्या भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागले.


वादाविना संपन्न, प्रशासनाचे कौतुक

नैसर्गिक संकट, गर्दी आणि ताणतणावाच्या पार्श्वभूमीवरही वादविवाद किंवा अपघाताशिवाय संपूर्ण उत्सव यशस्वीपणे पार पडला. शहरातील व्यापारी, पुजारी, सेवेकरी आणि मानकरी वर्ग यांनी सहकार्य करत प्रशासनावर विश्वास दाखविला. परिणामी, या वर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरच्या इतिहासातील संस्मरणीय अध्याय ठरला आहे.


 
Top