तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी, श्री तुळजाभवानी देविजींच्या अश्विन पोर्णिमा दिनी मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी लाखो भाविकांनी पायी चालत येवुन देवीचरणी अश्विनी पोर्णिमेची वारी सेवा अर्पण केली. मंगळवारी आलेल्या आश्विनी पोर्णिमा पुण्यपर्व दिनी देविजींच्या दर्शनासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली होती. श्रीतुळजाभवानी. आई राजा उदो उदो.. या जयघोषाने मंगळवारी संपूर्ण तुळजाई नगरी दुमदुमली होती.
श्री तुळजाभवानी देविजींच्या अश्विन पोर्णिमा परंपरेचे पालन करीत लाखो भाविकांनी मंगळवारी अश्विनी पोर्णिमा निमित्ताने देशातील कानाकोपऱ्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र व तेलंगणा, कर्नाटकातील लाखो भाविक सोमवार राञी पासुनच दि.6 ऑक्टोबर रोजी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे देविजींच्या दर्शनासाठी पायी दाखल झाले होते. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने अश्विनी पोर्णिमेची वारी करून देविजींचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मंगळवार रात्री भाविकांच्या अलोट गर्दीत सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यासह अश्विन पोर्णिमेच्या वर्षातील मानाची छबिना मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 वाजता चरणतीर्थ झाल्यानंतर सिंह गाभाऱ्यातील पलंगावर निद्रीस्त असणारी देविजींची मुळ मुख्य मुर्ती गर्भगृहातील सिंहासनावर पहाटे प्रतिष्ठापीत करण्यात आली. यानंतर देविजीस भाविकांचा सिंहसन पुजा व दही दुध पंचामृत अभिषेक पूजा केल्यानंतर देविजीची नित्योपचार पूजा करण्यात आली. पुन्हा सकाळी नित्याचे अभिषेक आरंभ झाले. ते संपल्यानंतर देविजीना अलंकार परिधान करण्यात आले. त्यानंतर सुवर्णालंकार घालून नित्योपचार पूजा करण्यात आली. आज अश्विनी पोर्णिमा पुण्य पर्वाच्या अनुषंगाने भाविकांनी देविजीस, पंचामृतअभिषेक पूजा, साडी चोळी पूजा, भोगी पूजा, गोंधळ, दंडवत पुरण वरणाचा चैवथ, माळ परडी घेणे, पोत पाजळणे यासह देवीजीचे धार्मिक विधी, कुलधर्म, कुलाचार मनोभावे केले. आज दिवसभर सर्व दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या.
पुनश्च सांयकाळी 7 वाजता भाविकांची अभिषेक पूजा देविजीस केल्यानंतर देविजीची नित्योपचार पुजा संपन्न झाली. नंतर सोलापूरच्या शिवलाड समाजाचा काठ्या, नंदीध्वज, छबिना अग्रभागी घेऊन मंदिर प्रांगणात आई राजा उदो उदोच्या गजरात संबळाचा कडकटात छबिना काढण्यात आला. नंतर महंत वाकोजी बुवा, गुरुतुकोजी बुवा यांनी प्रक्षाळ पूजा केली. त्यानंतर मंदीर प्रांगणात जोगवा मागण्याचा विधी होऊन या नवराञ पर्वाची सांगता झाली.