धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर भारतीय लोकशाही, न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला गंभीर हल्ला आहे, अशा शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, हल्ला करणाऱ्या नराधमाचा धिक्कार असो, मनुवादी सरकारचा धिक्कार अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळी 11.30 वाजता धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयावर झालेला हल्ला हा लोकशाहीच्या चारही स्तंभावर प्रहार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेवर हात उचलणाऱ्यांना लोकशाहीच्या न्यायालयातच उत्तर दिले जाईल. न्यायसंस्थेचा सन्मान, संविधानाची प्रतिष्ठा आणि लोकशाहीचा आत्मा अबाधित राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे न्यायसंस्थेचे गौरव आहेत आणि त्यांच्यावर हल्ला म्हणजे संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवर आघात आहे. संविधानाने दिलेल्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करणे आवश्यक आहे. हा हल्ला केवळ न्यायसंस्थेवरच नव्हे तर दलित, वंचित आणि सामान्य नागरिकांच्या आवाजावर गदा आणणारा असल्याचे महाविकास आघाडीने नमूद केले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.