धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर कॅम्पसच्या वतीने “मानसिक आरोग्य आणि समुपदेशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम”आज आयोजित करण्यात आला.या प्रशिक्षणामध्ये तुळजापूर तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी प्रो.रमेश जारे (टिस कॅम्पस संचालक, तुळजापूर) होते.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मैनाक घोष (मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. धाराशिव),डॉ.सतीश हरिदास (जिल्हा आरोग्य अधिकारी),श्री.अरविंद बोळंगे (तहसिलदार, तुळजापूर), हेमंत भिंगारदिवे (गट विकास अधिकारी) यांच्यासह चे तज्ञ, समाजसेवक व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकार .पुजार म्हणाले की,“मानसिक आरोग्य हा आजच्या काळातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे.विशेषतः अलीकडील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या ताण-तणावाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरचा हा उपक्रम काळाच्या गरजेला साजेसा आहे,असे त्यांनी सांगितले. पुजार पुढे म्हणाले की, ग्रामपातळीवर मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि समुपदेशन कौशल्ये विकसित झाली तर शेतकऱ्यांचा मानसिक आधार दृढ होईल आणि आत्महत्यांचे प्रमाण घटेल.
प्रो.बाळ राक्षसे यांनी मानसिक आरोग्य हा सामाजिक विकासाचा अविभाज्य घटक असल्याचे नमूद केले.डॉ.सतीश हरिदास म्हणाले की, समुपदेशन कौशल्यांचा विकास म्हणजे समाजात शाश्वत गुंतवणूक आहे.प्रो.रमेश जारे यांनी आपत्तीच्या काळात समाजाशी भावनिक एकात्मता साधणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ.संपत काळे यांनी “मनाचे आरोग्य हीच खरी समृद्धी” हा संदेश दिला.गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी या उपक्रमाला ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतीराज अभियान'शी सुसंगत असल्याचे नमूद केले.
संसाधन व्यक्तींमध्ये मेधा काळे यांनी “नैसर्गिक आपत्ती आणि मानसिक आरोग्य,” सुमिता भद्रिगे यांनी “आपत्ती व्यवस्थापनातील समुपदेशन,तर निशिकांत कांबळे यांनी “समुदाय मानसिक आरोग्य आणि संवाद कौशल्ये” या विषयांवर मार्गदर्शन केले. आभार श्री.देविदास कदम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.शंकर ठाकरे आणि TISS टीमने विशेष परिश्रम घेतले.हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी तसेच ग्रामपातळीवर संवेदनशील व सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.