धाराशिव (प्रतिनिधी)- दीपावलीच्या सणानिमित्त रामराव काळे जनरल कामगार संघटना व श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने बेंबळीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दीपावलीनिमित्त सत्कार करण्यात आला. अत्यंत मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

कामगार संघटनेचे राज्य सचिव व श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मनाळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनाळे यांच्यासह बेंबळी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक संतोष आगलावे, ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महिला सरचिटणीस विद्याताई माने, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उपेंद्र कटके, गोविंद पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी ॲड. कटके यांनी प्रस्ताविकात सांगितले की, “ग्रामपंचायतचे कर्मचारी हेच खरे गावाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती अबाधित आहे. त्यांच्यामुळेच ग्रामपंचायत मधली सर्व कामे सुरळीत सुरू असतात. यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.“ यावेळी विद्याताई माने यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या की, “कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणे गरजेचे आहे. सर्व कर्मचारी मन लावून काम करत असतात. त्यांचाही यथोचित गौरव होणे आवश्यक आहे.“

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वरिष्ठ लिपिक निळकंठ रेडेकर, संगणक परिचालक कृष्णप्रसाद गावडे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ग्राम रोजगार सेवक सूर्यकांत माने, कर्मचारी जुबेर फकीर, राहुल दाने, गौतम वाळवे, नेताजी माने, नेताजी भोरे, संगीता गायकवाड, बालिका माने आदींचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. रामराव काळे जनरल कामगार संघटना व श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे नंदकुमार मनाळे यांच्यातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यांना शाल श्रीफळ व किराणा कीट देण्यात आले.

 
Top