धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यामध्ये इनोव्हेटीव्ह जागरी मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आयजेएमए) या गुळ पावडर उत्पादक साखर कारखान्याच्या धाराशिव संघटनेची बैठक पार पडली. त्यामध्ये 2025-2026 या गळीत हंगामासाठी ऊसाचा खरेदीदर 2500 रुपये प्रती टन देण्यात येण्याचे बैठकीमध्ये ठरवून संघटनेने तसे प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. गुळ पावडर उत्पादक कारखान्यांकडून एफआरपीप्रमाणे दर मिळावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे.
सदरील गुळपावडर कारखान्याकडून सामान्य शेतकऱ्यांना आमचा व साखर संघ, साखर आयुक्त व शासन यांचा काहीही संबंध नसल्याचे वारंवार सांगून शेतकऱ्यांवर ऊस घालणेबाबत अप्रत्यक्षरित्या दबाव टाकत आहेत. तरी आम्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची साखर आयुक्त व शासनास विनंती की, गुळ पावडर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस दिला जातो. त्यामुळे त्या ऊसाबद्दल असणारे सर्व कायदे गुळ पावडर उत्पादक साखर कारखान्यांनाही लागु झाले पाहिजेत त्याबद्दल साखर आयुक्तांनी संबंधीत गुळ पावडर साखरकारखान्यांना व साखर उताऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचे पहिले देयक देणेबाबत आदेशीत करुन धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये मदत करावी तसेच अतिवृष्टीने बांधीत झालेले ऊस प्राधान्याने साखर कारखान्यास नेण्याचे आदेश द्यावेत अन्यथा या अन्याया विरोधात लोकशाही मार्गाने संबंधीतांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
