धाराशिव (प्रतिनिधी)- वसंत प्राथमिक आश्रमशाळा, विद्यानगर (बावी), येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व सर्व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी म्हणून दिले.
या माध्यमातून शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करत एकूण रुपये 33 हजार 256 रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी दिली आहे. ही देणगी 28 ऑक्टोबर 2025 रोजी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.सूरज मोटे यांच्याकडे डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,धाराशिवतर्फे या उदार आणि प्रेरणादायी देणगीबद्दल सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेली ही देणगी समाजातील गरजू घटकांसाठी दिलासा ठरणारी असून, वसंत प्राथमिक आश्रमशाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दाखविलेली ही सामाजिक संवेदनशीलता इतरांसाठी आदर्शवत ठरणारी आहे. मुख्याध्यापक,शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग यांना त्यांच्या या सामाजिक व मानवतावादी कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून,त्यांच्या पुढील शैक्षणिक,सामाजिक आणि मानवसेवेच्या कार्यांसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
