धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या प्रत्येक भूमीचा कण-कण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने पावन झाला आहे.महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले दुर्ग व गड हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे द्योतक आहेत.दरवर्षी दीपावलीच्या सणात बालके मातीचे किल्ले साकारून शिवरायांच्या कार्याचे स्मरण करतात.याच भावनेला पुढे नेत,महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‌‘अमृत' संस्थेने या दीपावलीत विश्वविक्रमी दुर्गोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या 12 दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून,संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानात भर पडली आहे.

दीपावलीच्या सुट्टीदरम्यान प्रत्येक घरात,अंगणात,बाल्कनीत किंवा सोसायटीच्या सार्वजनिक ठिकाणी या 12 दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सहभागी नागरिकांनी आपल्या तयार केलेल्या दुर्गाची प्रतिकृतीसह सेल्फी काढून <http://www.durgotsav.com/> या संकेतस्थळावर अपलोड करावा.

दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांच्या छायाचित्रांचे संकलन करून या उपक्रमाला विश्वविक्रमाचा दर्जा मिळविण्यात येणार आहे.या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने “अभिनंदन पत्र” पाठविण्यात येईल. ‌‘अमृत विद्या'द्वारे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.‌‘अमृत' संस्थेने तयार केलेल्या ‌‘अमृत विद्या' या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित 999 रुपये किंमतीचे प्रशिक्षण सर्व सहभागींना निःशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये  स्वराज्यरक्षक दुर्ग,शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना,कवी भूषण यांची कवने,स्वराज्य योद्ध्यांच्या परिचयाची ृंखला.अशा विविध विषयांचा समावेश आहे.

या 12 दुर्गांपैकी एक साकार करा. निवडण्यासाठी उपलब्ध दुर्ग-रायगड,राजगड,प्रतापगड,सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग,खांदेरीचा दुर्ग,जिंजी, पन्हाळगड,शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुंवर्णदुर्ग).

सेल्फी मार्गदर्शन : 12 दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती साकारावी.सेल्फीत दुर्गाचा जास्तीत जास्त भाग दिसेल,याची काळजी घ्यावी.

‌‘दुर्गोत्सव 2025' या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अनावरण शिवसृष्टी हिस्टोरिकल थीम पार्क,पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय जोशी यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमात अमृत संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे, सिद्धेश्वर वरणगावकर आणि राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. विजय जोशी म्हणाले,“महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक  लहान असो वा मोठा  दिवाळीत गडदुर्गाची प्रतिकृती बनवून,त्यासह सेल्फी घेऊन ‌‘दुर्गोत्सव' संकेतस्थळावर अपलोड करावा.हीच आपल्या शिवरायांना खरी मानवंदना ठरेल.”


 
Top