तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अपसिंगा येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर, आणि तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने पीक कापणी प्रयोग करण्यात आला.

या प्रयोगाद्वारे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे वास्तव प्रत्यक्ष समोर आले. रँडम पद्धतीने निवडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकाचा “दहा बाय पाच मीटर” (अर्धा गुंठा) इतक्या क्षेत्रातील कापणी करून, मिळालेल्या उत्पादनाची नोंद महसूल, कृषी, ग्रामविकास आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

जिल्हाधिकारी पूजार यांनी या वेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्काचा विमा लाभ मिळायलाच हवा. कोणतीही तडजोड न करता पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा,” असे निर्देश विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी प्रयोगादरम्यान जमिनीतील ओलावा, पिकाची वाढ, नुकसानाचे प्रमाण याबाबतही प्रत्यक्ष पाहणी केली.

या प्रयोगावेळी गावातील सरपंच राहुल साठे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरे, चंद्रकांत डांगे, पप्पू पाटील, माजी सरपंच दीपक सोनवणे, शेतकरी विकास रोंगे, मारुती कोपे, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी  शिंदे, तसेच सहायक कृषी अधिकारी श्रीमती रंगदळ आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा दृढ झाला असून, जिल्हाधिकारी पूजार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने घेतलेली ही पुढाकारात्मक कृती “शेतकऱ्यांच्या हक्काच्या न्यायासाठीचे पाऊल” म्हणून ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरत आहे.


 
Top